सेनापती / आमदार ही खुप प्रसिध्द अशी कोल्हापुरी वहाण आहे. पारंपरिकरित्या हिची खासियत म्हणजे या वहाणेवर असलेली कलाकुसर.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या "कापशी" गावात, अस्सल चामड्यात बनवली जाणारी ही वहाण, बऱ्याचदा जागेवरून कापशी म्हणूनही ओळखली जाते. आणि साधारणपणे कोल्हापुरी चप्पल म्हणलं की हीच डोळ्यासमोर येत असते. पण हे प्रसिद्ध असणं, उच्च दर्जाची कलाकुसर आणि कच्चा माल असणंच या वहाणेसाठी पुढे अडचणीचं ठरणार होतं.
वाढत्या मागणीमुळे, कापशीच्या वेगवेगळ्या दर्जाच्या बऱ्याच आवृत्या येत गेल्या. जसं जवळपास इतर सर्वच चांगल्या कलाकृतींच्या बाबतीत होतं, तसंच काहीसं होऊन सर्वसाधारण दर्जाच्या कच्च्या मालात बनलेल्या कोल्हापुरीही बाजारात सर्रास मिळू लागल्या; आणि इथेच कुठेतरी आमदार/सेनापती कापशी तिचा आत्मा गमावू लागली.
असं घडतच असतं वगैरे एकवेळ विचार करूही शकतो पण हद्द म्हणजे अस्सल कलाकृती बनवायला बराच वेळ, श्रम, गुंतवणूक लागत असतांना कमी दर्जाची वस्तू मात्र जास्त प्रमाणात विकली जाऊन हळूहळू ही सुमार दर्जाची कोल्हापुरीच खरी कापशी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे! हे या कलेसाठी जास्त घातक आहे, आणि आमदार कापशीच्या बाबतीत हे मोठ्या प्रमाणात होते आहे.
हे सर्व कुठेतरी टाळता यावं, सामान्य माणूस या कलेच्या बाबतीत नाहीतर कमीतकमी तो विकत घेणार त्या कोल्हापूरीच्या बाबतीत तरी सजग व्हावा या उद्देशाने वहाणने ही सर्व माहिती मांडायचा प्रयत्न केलाय.
आमदार कापशी सहसा तीन प्रकारात येते:
१. साधारण कापशी: म्हणजे सेनापती कापशी जी संपूर्ण हाताने शिवलेली कोल्हापुरी चप्पल असते. ही दोन-वादि असते. वादी म्हणजे चामड्याची वेणी. वेण्या काढणं हे खूपच बारकाईचं काम असते. खास करून स्त्रियांकडून या वाद्या घडवल्या जातात, कारण हे करण्याचा त्यांच्याकडे खुप वर्षाचा अनुभव असतो. सेनापती वहाणेवर पट्टा असतो ज्यावर वेण्या विणल्या जातात. यातही भरपूर फरक आढळतो. काही ठिकाणी ८ वेण्यांचा तर काही ठिकाणी १२ वेण्यांचा पट्टा असतो. प्रत्येक कलाकाराची स्वतःची एक नजाकत असते आणि त्याची वर्षानुवर्षे त्याची स्वतःची एक शैली घडत जाते.
हि अनेक कारणांसाठी वापरली जाते, artistic लोक किंवा हलकी फुलकी वहाण वापरायची आवड ठेवणारे खास आवडीने पेपर कापशी वापरतात.